दुपारची वेळ.साधी ढोलकी विकणारा एक माणूस कसेबसे आपले पोट भरायचा केविलवाणा प्रयत्न करीत होता.बाजूला त्याचे दोन उपाशी पोरं कोणीतरी ढोलकी घेईल आणि मग पोटात काहीतरी पडेल अशी अशा बाळगत होते.एका माणसाचं हृदय हे दृश्य बघून कंपित होतं.तो एक ढोलकी हात घेतो आणि वाजवू लागतो.क्षणात अख्खा बाजार तिथे जमतो.केवळ एका ढोलकीच्या आधारे त्या माणसाने अख्ख्या जमावाला वेड लावलेले असते. क्षणात लोकं पैसे काढून त्या माणसाच्या पुढ्यात ठेवतात.तो माणूस साश्रू नयनांनी ते पैसे उचलतो,त्या ढोलकीवाल्याला देतो आणि निघून पडतो.
हा उमद्या दिलाचा माणूस म्हणजे उस्ताद अल्लाउद्दीन खान साहेब.पंडित अलि अकबर खान,पंडित निखिल बांन्नेर्जी,अन्नपूर्णा देवी,पंडित रविशंकर,पंडित पन्नालाल घोष यांचे गुरु आणि संपूर्ण भारतीय संगीताचे पितामह भीष्म.अल्लाउद्दीन खान यांना सर्व भारतीय वाद्ये वाजवता यायची आणि ती पण इतक्या कुशलतेने कि या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य,त्याचा एक एक क्षण केवळ हेच वाद्य शिकण्यास अर्पिला कि काय असे समोरच्याला वाटावे.
अल्लाउद्दीन खान हे खरे स्वर योगी होते.भगवान रजनीश यांना संगीतातून कोणी परमात्म्यापर्यंत पोहोचले आहे का असे विचारताच त्यांनी केवळ एकच नाव घेतले.ते म्हणजे उस्ताद अल्लाउद्दीन खान.ओशो आणि अल्लाउद्दीन खान यांचे खूप जवळचे आणि नाजूक हितसंबंध होते.अल्लाउद्दीन खान यांना भेटायला ओशो स्वतः वेळात वेळ काढून मैहर ला जायचे.
अल्लाउद्दीन खान यांनी अनाथ आणि निराधार लोकांना स्वतः शिकवून उदयास आणलेला मैहर वाद्यवृंद आज साऱ्या जगात प्रसिध्द आहे.अल्लाउद्दीन खान यांच्या कित्येक दुर्मिळ ध्वनिफिती आज उपलब्ध आहेत आणि त्या ऐकून कोणीही सामान्य माणूस त्यांची पारलौकिकता जाणून घेऊ शकेल.